शासनजमिनीवर JCBचा डल्ला? गट नं. १३८ मधील अनधिकृत खोदकामावर ग्रामस्थांचा संताप

   

प्रतिनिधी : ( बजरंग चौधरी ) कसबे बामणोली, ता. जावळी येथील मौजे पावशेवाडी (कसबे बामणोली) येथील गट क्रमांक १३८ मध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या नावे नोंद असलेल्या जमिनीवर कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता थेट JCBच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक १३८/७ मधील काही हिस्सा सुभाष गोरे यांच्या नावे असला, तरी उर्वरित संपूर्ण गट क्रमांक १३८ मधील जागेवरही खोदकाम केल्याचा आरोप होत आहे. संबंधितांनी त्यांच्या मालकीपलीकडील क्षेत्रातही जमीन खोदल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर जमीन कोयना प्रकल्पाच्या काळात शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली असून सध्या ती शासन नोंदीत आहे. असे असताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू असलेले खोदकाम हे स्पष्टपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
      विशेष म्हणजे, या जमिनीबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याची माहितीही पुढे आली आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात अशाप्रकारे काम सुरू ठेवणे म्हणजे न्यायप्रक्रियेत थेट हस्तक्षेप असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून काम बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
    ग्रामस्थांनी प्रशासनाला घटनास्थळी त्वरित भेट देऊन पंचनामा करण्याची, गट क्रमांक १३८ मधील सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवण्याची आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
        दरम्यान, या गंभीर आरोपांवर महसूल व पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते, तसेच न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असताना सुरू असलेल्या या कामावर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post