प्रतिनिधी : बजरंग चौधरी
राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळण्यात होणारा विलंब, कागदपत्रांची अडचण आणि निधीअभावी थांबलेले उपचार यावर आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि Tata Trusts यांच्यात आज ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला असून, राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आणि टाटा समूहाचे प्रमुख Noel Tata यांच्या उपस्थितीत हा करार झाला. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांना उद्योग क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्याने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या करारामुळे कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार तसेच महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत मागणाऱ्या रुग्णांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद आर्थिक सहाय्य मिळणार आहे. गरिबांना उपचारासाठी दारोदारी फिरावे लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे, संजय राठोड, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर, अभिनेते Nana Patekar, Makarand Anaspure तसेच वरिष्ठ अधिकारी आणि टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शासन व उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून उभा राहिलेला हा करार केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यातील हजारो कुटुंबांसाठी हा करार आशेचा आणि दिलासाचा ठरणार आहे.
