केळघर : - बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे , केळघर - मेढा परिसरातील ५४ गावातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा . याकरिता केंडबे व परिसरातील महिलांनी केळघर - मेढा बाजारपेठेत रॅली काढत कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यासाठी रवाना झाल्या . महिलांच्या या अभिनव रॅलीची चर्चा सर्वत्र होती .
केडंबे ( ता . जावली ) येथील आई श्री महालक्ष्मी ट्रस्टच्यावतीने या रॅलीचे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला बोंडारवाडी धरणासाठी साकडे घालण्यासाठी महिलांचे नियोजन करण्यात आले . प्रारंभी केडंबे येथून सर्व महिला केळघर येथे दाखल झाल्या . यावेळी ट्रस्टच्या व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने श्रीफळ वाढवून रॅलीचा व यात्रेचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी आई श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष वैभव ओंबळे , शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे ,युवा उद्योजक राजेंद्र धनावडे , श्रमिकचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे , विलासबाबा जवळ , सचिन करंजेकर , नारायण सुर्वे , श्रीरंग बैलकर , समाधान ओंबळे , भानुदास ओंबळे , दिपक मोरे , अनिल ओंबळे , चंद्रकांत धनावडे ,उषा उंबरकर , वैशाली शेलार , बोंडारवाडी धरण कृती समितीचे कार्यकर्ते , ग्रामस्थ , युवक उपस्थित होते .
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वैभव ओंबळे म्हणाले , केळघर - मेढा परिसराला वरदान ठरणारे बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे . याकरिता केडंबे व परिसरातील महिला कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यासाठी जात असून यामध्ये २०० महिला सहभागी झाल्या आहेत . यावेळी मेढा येथे रॅली प्रसंगी विलासबाबा जवळ म्हणाले , पाणी टंचाईच्या सर्वात जास्त झळा महिला भगिनींना बसतात , त्यांच्या डोक्यावरील हंडा खाली यावा म्हणून त्या आज अंबाबाई देवीला साकडे घालायला निघाल्या आहेत . देवी अंबाबाईच्या कृपेने हे धरण लवकरात लवकर व्हावे . तर लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नाने , बोंडारवाडी ग्रामस्थांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे '
प्रारंभी या यात्रेत सहभागी झालेल्या महिला व बोंडारवाडी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केळघर व मेढा बाजारपेठेत रॅली काढत . ' गती द्या , गती द्या बोंडारवाडी धरणाला गती द्या . स्व विजयराव मोकाशी अमर रहे , त्यांच्या स्वप्नातील बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे . पाणी आमच्या हक्काच , नाही कुणाच्या बापाचं ' ,अशा घोषणा देण्यात आल्या . यामुळे या अभिनव रॅलीची सर्वञ चर्चा होती . यावेळी केडंबे ग्रामस्थ , युवक , बोंडारवाडी धरण कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते .