केडंबे येथे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


केळघर:- १४ वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी भारताच्या संविधानावर केलेल्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले . यावेळी तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला . त्यांचे प्रेरणादायी असे स्मारक उभे राहण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल . असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे यांनी केले .
     केडंबे ( ता . जावली ) येथे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी माजी जि . प . सदस्य दिपक पवार , शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट ) जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे , भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे , गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार , मंडलाधिकारी उमेश डोईफोडे , विस्ताराधिकारी अमित पवेकर , वसंत धनावडे , तलाठी सूरज माळी , उपसरपंच महादेव ओंबळे , माजी सरपंच बंडोपंत ओंबळे , चंद्रकात ओंबळे, वैभव ओंबळे , प्रशांत जुनघरे , सचिन शेलार , राजेश बेलोशे , साहेबराव शेलार आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
   यावेळी दिपक पवार म्हणाले , शहीद तुकाराम ओंबळे यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देत , या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले . याचा समस्त जावलीसह देशवासियांना गर्व आहे . अशा शूरवीराचे स्मारक लवकरात लवकर व्हावे .
        शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट ) जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले , शासनाने आमचे बंधू शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनी त्यांचे केडंबे येथे स्मारक बांधण्याचा निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे . त्यासाठी ७१ कोटींचा निधी देण्याचे प्रस्तावित आहे . त्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होईल . असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटी दरम्यान सांगितले असून त्यांनी तात्काळ राज्याच्या प्रधान सचिवांना फोन लावून स्मारकाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात मागवली असल्याची माहिती यावेळी दिली . तसेच पुढील आठवड्यात १५ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करणार असून मी स्वतः भूमीपूजनासाठी येणार आहे . असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले असल्याची माहिती  एकनाथ ओंबळे यांनी दिली .
            प्रारंभी आ . शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी दूरध्वनीवरुन शहीद तुकाराम ओंबळे यांना आदरांजलीचा संदेश देत . स्मारकासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले . यावेळी  शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य , खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी , सरपंच , ग्रामस्थ , शिक्षक वर्ग उपस्थित होते . प्रारंभी स्वागत बळवंत पाडळे यांनी केले . आभार वैभव ओंबळे यांनी मानले .
Previous Post Next Post