केळघर परिसरात आजपासून ग्रामदैवतांच्या यात्रांना सुरुवात


केळघर :  परिसरातील ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रांचा हंगाम सुरू होत असून, कुरुळोशी येथील काळभैरवनाथाच्या यात्रेने केळघर परिसरातील यात्रांचा हंगाम सुरू होत आहे.
शुक्रवारी (ता. १०) व शनिवारी (ता. ११) अशी सलग दोन दिवस कुरुळोशीची यात्रा होणार असल्याची माहिती माजी सरपंच रमेश वाडकर यांनी दिली. शनिवार हा कुरुळोशी येथील यात्रेचा मुख्य दिवस आहे. आंबेघर व आसनी येथील श्री आशीलमाल देवाची यात्रा रविवार व सोमवारी होणार आहे. रविवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजता आशीलमाल व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा होणार आहे. सोमवार हा आंबेघर व आसनीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. आंबेघर येथील यात्रेनिमित्त
जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली. केळघर येथील श्री भैरवनाथाची वार्षिक यात्रा सोमवारी (ता. १३) व मंगळवारी (ता. १४) होणार आहे. सोमवारी रात्री भैरवनाथाचा छबिना निघणार आहे. मंगळवार हा केळघर येथील यात्रेचा मुख्य दिवस आहे. भैरवनाथ यात्रेनिमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमासह कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन केल्याची माहिती शंकर बेलोशे यांनी दिली. केडंबेत श्री भैरवनाथाची वार्षिक यात्रा मंगळवारी व बुधवारी होणार आहे. बुधवार (ता. १५) हा केडंबे येथील यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा हंगाम सुरू झाल्याने यात्रा समितीची लगबग सुरू असून, मुंबईकर चाकरमानी गावाकडे येत असल्याने ग्रामीण भागात वर्दळ वाढू लागली आहे.
Previous Post Next Post