केळघर : परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज स्वामींच्या आशीर्वादाने ओखवडी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त (शनिवारी) व रविवारी (ता. १५) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती केळघर सोसायटीचे संचालक शशिकांत शेलार, सरपंच कौसल्या शेलार, उपसरपंच हरिभाऊ पार्टे, ग्रामपंचायत सदस्य संपत शेलार यांनी दिली.
शनिवारी दुपारी दोन वाजता आरतीने कार्यक्रमास सुरुवात होईल. दुपारी तीन वाजता काळेश्वरी भजन मंडळातर्फे भजनाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मकाळ व हरिपाठ होईल.
रात्री नऊ वाजता संतोष महाराज ढाणे (नागठाणे) यांचे कीर्तन होईल. रविवारी पहाटे पाच वाजता काकड आरती व सकाळी सात वाजता अभिषेक होईल. सकाळी आठ वाजता केदारेश्वर भजन मंडळ, मामुर्डी यांचे भजन होईल.
सकाळी अकरा वाजता प्रवीण महाराज शेलार यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी दोन वाजता दिंडी सोहळा त्यानंतर महाआरती व मान्यवरांचा सत्कार होणार आहे. दुपारी चारनंतर महाप्रसाद होईल. धार्मिक कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ ओखवडी यांनी केले आहे.