मतदार गृहभेट दिवसानिमित्त मतदारांशी संवाद साधताना सपना घोळवे, एच. ए. चव्हाण, लीना पवार, समवेत अंगणवाडी सेविका व मदतनीस
केळघर : लोकशाहीत मतदान हा मतदारांचा सर्वात मोठा हक्क आहे. मतदानामुळे देशाच्या प्रगतीसाठी योग्य सरकार निवडण्यासाठी मतदार महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून देशनिर्मितीच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी केले.
मतदार जनजागृती साठी व मतदानाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने ४ मेला ( शनिवारी ) मतदार गृहभेट दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तालुक्यातील विविध प्रवर्गातील मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, तालुका कृषि विस्तार अधिकारी एच. ए. चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केदार कुलकर्णी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका लीना पवार, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,मदतनीस उपस्थित होत्या.यावेळी घोळवे पुढे म्हणाल्या, मतदार जनजागृती साठी मतदार गृहभेट दिवस या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीनिहाय १०० टक्के कुटुंबापर्यंत पोचून मतदान करण्याबाबत मतदारांची जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृती चे काम मतदानाच्या शेवटचे तासापर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी घोळवे यांनी जावळी तालुक्यातील वाहिटे, वाटंबे,केळघर, मुकवली,रिटकवली,येथे दिव्यांग मतदार व इतर मतदारांच्या गृहभेटी घेऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.