जागतिक वन दिवस हा दरवर्षी 21 मार्च ला साजरा करण्यात येतो. भारतीय समाजाने वनाला नेहमीच आपला सखा, सहचरी मानले आहे. "वृक्षवल्ली आम्हां सोयरे" म्हणत तुकाराम महाराजांनी वृक्षाचं महत्त्व निसंदिग्धपणे अधोरेखित केले आहे. प्राचीन वाडः मयाने तर पदोपदी वृक्षांचे, जंगलाचे महत्व विशद केले आहे. वृक्षांचे महत्व सांगणाऱ्या ऋचा, वेद वाडःमयात आढतात. या ऋचा मानवी जीवनाचा आनंद वृक्षसंवर्धनात कसा आहे. हे तर सांगतातच पण त्या शिवाय जैवविविधतेचेही महत्व सांगतात. काळानुरुप मानवी समाजाच्या प्रगतीसोत वनासंबंधीच्या आपुलकीच्या कल्पनाही प्रगत होत गेल्या. वनांच्या बांधिलकीसोबत वन्य जीवांचं रक्षण, पर्यावरण या कल्पनेलाही मानवाने आपल्या हृद्यात जिव्हाळयाचे स्थान दिले.
वनाचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध जंगलावर अवलंबून असलेली औषधप्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत जागरुता पसरण्यासाठी, जंगल निर्माण, संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने जागतिक दिवस म्हणून हा साजरा करत असतो.
वृक्षांचे मानवी जीवनाशी असलेले मायेचे नाते आपल्या उन्नतीसाठी वृक्षांचे संवर्धन या कल्पनेला माणसाने आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान दिले. कारण वृक्ष आहे तर पर्यावरण सुंदर आहे आणि पर्यावरण सुंदर आहे तर मानवी आरोग्य सुंदर आहे. मानवी आरोग्य संस्कृती सुंदर आहे. हे माणसाला कळून चुकले होते.
या सृष्टीतील लहान असो वा मोठा, कोणताही जीव निरर्थक नाही, व्यर्थ नाही. प्रत्येकाचा या सृष्टीचक्राला सुंदर आणि गतीमान ठेवण्यात वाटा आहे. दुदैवाने आजच्या या स्पर्धात्मक काळात मानवाने आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी वनांवर कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली. वैयक्तिक सुखोपभोगाला जास्त महत्व देऊन निसर्गाची अक्षम्य हेळसांड करायला सुरुवात केली. त्यामुळे जागतिक हवामानावर परिणाम झाला, समुद्र पातळीत वाढ झाली, जैवविविधतेची साखळी धोक्यात आली, पर्यावरणाचे संतुलन बिघडले आणि माणसाचे नैसर्गिक स्वास्थ हरवले. आजच्या काळात सगळ्यांना विकास हवा आहे आणि तोही झटपट ! खरं तर विकासाची इच्छा बाळगण्यात चुकीचे काहीच नाही- 'फक्त विकास म्हणजे नक्की काय ?' हे प्रत्येकाने समजून घेतले तर बरं होईल. अनियंत्रित आणि एकांगी विकास म्हणजे पृथ्वी उजाड करीत चाललो आहोत! ही कृती आत्मघातच आहे आणि हे टाळायचे असेल तर पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही. एखाद्या यंत्राचे किंवा गाडीच्या इंजिनचे उदाहरण घेऊ, त्याचा एखादा भाग नादुरुस्त झाला तर त्याची कार्यक्षमता कमी होते. तो इशारा असतो. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर एखाद्या दिवशी बंदच पडते. पर्यावरणाचे असेच आहे. तो सारखे इशारे देतो आहे. निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरुन कायमचे नष्ट झाले आहेत. वा होत आहेत, प्रदुषणचा भस्मासूर विविधरंगी वसुंधरेला कुरुप करतो आहे आणि आम्ही त्याकडे डोळेझाक करुन स्थितप्रज्ञपणे उघड्या डोळ्यांनी हा विनाश बघतोय. हा विनाश आम्हाला थांबवायला हवा आहे. आमची पृथ्वी आम्हाला तितकीच सुंदर, देखणी, तिच्या साऱ्या लेकरांसह सुरक्षित हवी आहे. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण हा एकमेव उपाय आहे.
त्यासाठी प्रत्येकामध्ये ही सजगता आणि पर्यावरण रक्षणाच्या जपणुकीची भावना निर्माण होणे अत्यंत महत्वाचे आहे. पण हे कार्य केवळ एकट्या दुकट्याचे नाही. सरकार बघेल असे म्हणून त्याला नकारता येणार नाही. त्याकरीता प्रचंड लोकसहभागाची गरज आहे. गाव करी ते राव न करी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. जेव्हा एखाद्या मुल्याविषयी लोकजागृती होते आणि सारे समाजमन त्यासाठी कार्य करु लागते तेव्हा अशक्यप्राय वाटणारी गोष्टही सहज साध्य होते. हा त्या म्हणीचा अर्थ आहे. हा लोकसहभाग मला मोलाचा वाटतो. जेव्हा सारा समाज पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभा राहील तेव्हा सुंदर पर्यावरण केवळ स्वप्न राहणार नाही.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात तर वनांचे फार महत्व आहे. एक इंच जमीनीचा सुपीक थर तयार होणेसाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो. परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळ्यातच होत असते. म्हणून वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थीक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. वनांत हवामान बदलाशी जुळून घेणे, तसेच जैवविविधतेच्या रक्षण करणेच्या कामी वन परिसंस्था महत्वाची भुमिका बजावते. जागतिक तापमान वाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांमुळे होते. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच हानी होते असे नाही, तर वनउपजाची क्षमता ही कमी होते. जमिनीची धूप होऊन जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली होते. वन्यजीवांची होळपळ होते.
प्रदूषण, हवामान बदल इत्यादी पर्यावरणीय समस्या मानवाला त्यांच्या जीवनशैली बददल पुर्नविचार करण्यास प्रवृत्त करत आहे. आज आपलेल्या सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे सर्वसामान्यांना आणि सुशिक्षित वाचकांना पर्यावरणांच्या संकटाची जाणीव करुन देण्याची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेण्याची आपण आपल्या पर्यावरणाचा सांभाळ करु अशी प्रतिज्ञा घेवूया. आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षक करुया. तसेच 21 मार्च जागतिक वर्नादनानिमित्त सर्व मानवजीतीने वनांचे व वन्यजीवांचे अधिवास सुरक्षित ठेवूया व आपण आपल्या वनांचे रक्षण करुया.