आंबेघरच्या विठ्ठलधाममध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा
केळघर : - आंबेघर तर्फ मेढा (ता. जावळी) येथे नव्याने उभारलेल्या प्रतिपंढरपूर क्षेत्र विठ्ठलधाममध्ये या वर्षीपासून कार्तिकी एकादशीला गुरुवारी दि.23 -11 -2023 रोजी वारी सोहळा सुरू होणार आहे, तसेच या दिवशी येथे महापूजा, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचा जिल्ह्यातील भक्तांनी आनंद घ्यावा, असे आवाहन प्रवीण महाराज शेलार यांनी केले आहे.
जावळी तालुक्यातील भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी, याकरिता आंबेघर येथे प्रतिपंढरपूर विठ्ठलधामची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा याच वर्षी झाला. याठिकाणी या वर्षीच्या कार्तिकी वारीपासून दर वर्षी दिंडी सोहळा होणार आहे, तसेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने गुरुवार दि. 23 - 11 -2023 रोजी विठ्ठलधाममध्ये पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा आमदार
महेश शिंदे, पोलिस अधीक्षक समीर शेख, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजनही याठिकाणी करण्यात आले आहे.
जावळी तालुक्यातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या काळात शेतातील कामांमुळे इच्छा असतानाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही. भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्या भागातच व्हावे म्हणून स्थापन केलेल्या विठ्ठलधाममध्ये वारी सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या वर्षी सुरू होणाऱ्या वारी सोहळ्यात जावळी तालुक्यातील, तसेच सातारा जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित राहून वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन विठ्ठलधामचे संस्थापक प्रवीण महाराज शेलार यांनी केले आहे.