मोहन जगताप - मराठा आरक्षणासाठी स्वत:चे प्राण पणाला लावलेल्या मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी हजारोंची रीघ अंतरवली सराटी येथे लागलेली आहे. राज्यभरातील मराठी बांधवासाठी देव ठरलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी जावलीचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ हेही गेले होते. तिथे त्यांनी जरांगे-पाटील यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या वडीलांशी संवाद साधला. यावेळी सदाशिवराव सपकाळ यांनी जरांगेपाटील हे व्यक्ती राहिलेले नसून ते मराठा समाजाची दैवी शक्ती झाली असल्याची भावना व्यक्त करत आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील जनतेच्यावतीने केली.
याबाबत अधिक वृत्त असे, मनोज जरांगेपाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून त्यांना भेटण्यासाठी अंतरवली सराटी येथे राज्यभरातून हजारो नागरिक येत आहेत. असंख्य मराठा बांधव येणाऱ्या मराठा बांधवांची सेवा करत आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगे-पाटील यांची स्थिती गंभीर होवू लागली असून राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन पेटले असताना अद्याप शासनाकडून ठोस पावले टाकली जात नसल्याची भावना आहे. या मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी जावलीचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ अंतरवली सराटी येथे गेले होते. त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते सुनील पोरे, पत्रकार मोहन जगताप हे उपस्थित होते.
अंतरवली सराटी येथे मंडपात क्षीण अवस्थेत पहुडलेल्या व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्राण पणाला लावलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाहून माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांच्यासह सहकाऱ्यांचे डोळे पाणावले. जरांगे-पाटील यांची अवस्था फार बोलण्यासारखी नव्हती. या सर्वांनी तिथेच त्यांचे दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांच्या घरी सर्वजण गेले. तिथे मनोज जरांगे-पाटील यांच्या वडिलांबरोबर सदाशिवराव सपकाळ यांनी संवाद साधला. मनोज जरांगे-पाटील हे पाटील हे आता व्यक्ती राहिलेले नसून ते मराठा समाजाची शक्ती झाले असल्याचे सांगत तुम्ही एका महान सुपुत्राला जन्म दिला असून तो आता महान व्यक्तींच्या रांगेत जावून बसला असल्याची भावना व्यक्त करत सदाशिवराव सपकाळ यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील हे महान व्यक्तींच्या रांगेत
मराठा आरक्षणासाठी लढा देण्याचे महान कार्य जरांगे-पाटील यांनी केलेले असून तुमच्या घराने केलेला त्याग महाराष्ट्रातील मराठा बांधव कधीही विसरणार नाहीत. जरांगे पाटील यांचे 42 वर्षे असेल पण माझे वय 62 असताना देखील त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी सातारहून दूरवरुन येथे आलो. कारण मनोज जरांगे पाटील यांचे नाव आता छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या रांगेत जावून बसले आहे. म्हणूनच आम्ही त्यांचे दर्शन घेतले आहे. आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचा जीव पणाला लावू नये, दोन पावले मागे पुढे करुन हे उपोषण थांबवावे, अशी आमची सातारकरांची विनंती आहे. भविष्यात जेव्हा ते आवाज देतील तेव्हा लाखोच्या संख्येने मराठी बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहतील, अशीही भावना सदाशिवराव सपकाळ यांनी जरांगे पाटील यांच्या वडिलांशी संवाद साधताना व्यक्त केली.
माजी आमदार सदाशिवराव सपकाळ आरक्षणप्रश्नी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी . सरकार, राजकारणी गेंड्याच्या कातडी जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले ही आमच्यासह महाराष्ट्र्रातील मराठी बांधवासाठी प्रचंड मोठी गोष्ट आहे. मात्र, हे सरकार व राजकारणी गेंड्याच्या कातडीचे असून ते लवकर न्याय देतील असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सुपुत्राला उपोषण सोडण्याची विनंती करावी असे सांगताना आता यापुढे राज्यातील लाखो मराठे मावळे जरांगे-पाटील यांनी हाक मारताच त्यांच्या पाठीशी उभे असतील, अशी भावना सदाशिवराव सपकाळ यांनी व्यक्त केली. तर हे सरकार व राजकारणी गेंड्याच्या कातडीचे असून सरकारने तातडीने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. भले कोर्टात टिको न टिको आता लढाई सुरुच राहणार असून मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव कधीही तुम्हाला माफ करणार नाही, अशी भावना व्यक्त केली.