केळघर : नांदगणे पुनवडी पुलाच्या बांधकामासह दोन्ही बाजूकडील भरावाचे काम पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीस खुला झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली . यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आर एच आहिरे , जावली उपविभागाचे उपअभियंता डी एच पवार व मेढा एसटी आगारप्रमुख निता बाबर - पवार यांनी या रस्त्याची व पुलाची पाहणी केली .
या पुलाच्या बांधकामासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाच कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंती व भरावाचे काम अतिवृष्टीमुळे प्रलंबित होते. मात्र आता भरावाचे व रोलिंगचे काम केले आहे . त्यामुळे या पुलावरून वाहतुक सुरु झाल्याने पुनवडी , केंडबे , बोंडारवाडी परिसरातील विद्यार्थी, नागरिकांची सोय झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागत आहेत . पुलाच्या नांदगणे व पुनवडी बाजूकडील नदी पात्रातील संरक्षण भिंती तसेच पायऱ्या करण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याची माहिती देत , सध्या पावसाळ्याचे दिवस असून या परिसरातील नागरिकांनी पुलावरून रहदारी करताना काळजी घ्यावी .असे यावेळी श्री रांजणे यांनी सांगितले . दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आर एस आहिरे यांनी पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षण भिंती , रस्त्याचे मजबुतीकरण , डांबरीकरण आदि कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले .
यावेळी मोहनराव कासुर्डे , रामभाऊ शेलार ,सागर धनावडे, सुनिल नाना जांभळे , पुनवडीचे सरपंच सुरेश पार्टे, बंडोपंत ओंबळे, सूर्यकांत रांजणे ,अंकुश बेलोशे, गणपत ओंबळे , कोंडीबा कासुर्डे , नदीम आतार , सुनिल गोळे यांच्यासह नांदगणे, पुनवडी ,केडंबे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.