सातारा जिल्हा बँकेची मेढा शाखा नूतन जागेत सुरु , शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी बँक तत्पर - ज्ञानदेव रांजणे ( साहेब )
केळघर : - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा बँक सातत्याने विविध योजना राबवत असते. जिल्हा बँकेची मेढा शाखा नूतन जागेत सुरु झाली असून यापुढील काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या वतीने अधिकाधिक सुविधा दिल्या जातील ,अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली.
मेढा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीत जिल्हा बँकेचे कामकाज आजपासून सुरू करण्यात आले,त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय विकास अधिकारी अण्णासाहेब फरांदे, विक्री आधिकारी संजय निकम, विकास अधिकारी अरुण खटावकर,मेढा शाखाप्रमुख संतोष देशमुख, ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, कोंडीबा कासुर्डे,सागर धनावडे,राजाराम खुडे, हणमंतराव धनावडे,सुनील जांभळे, अक्षय धनावडे, आनंदा बेलोशे, आकाश भिलारे, अपर्णा जांभळे, मंगेश निकम, धनंजय महामुलकर,नितीन पोफळे ,दीपक शेलार आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा बँक व ज्ञानदेव रांजणे ( साहेब ) मित्र समूह यांच्यावतीने पञकारांचा सत्कार करण्यात आला .
रांजणे पुढे म्हणाले, जिल्हा बँकेची शाखा नूतन इमारतीत सुरु झाली असून या इमारतीत बँक अधिक वेगाने काम करेल. जिल्हा बँकेत आधुनिक तंत्रज्ञान वापर केला जातो त्यामुळे स्पर्धेच्या युगात जिल्हा बँक निश्चितच चांगली सेवा देईल. यावेळी जिल्हा बँकेचे कर्मचारी, सभासद उपस्थित होते.आण्णासाहेब फरांदे यांनी स्वागत केले. संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सागर धनावडे यांनी आभार मानले.