केळघर ( संदिप गाडवे ) :सुरक्षित प्रवासाची हमी फक्त एसटी महामंडळ देते हा दृढ विश्वास राज्यातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेला वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे प्रवासी बांधवांचा हा विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी एसटीच्या चालकांनी दक्ष राहून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा द्यावी,असे आवाहन महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी केले.
महाबळेश्वर आगारात आज सुरक्षितता अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार सविता अवघडे, कॉन्स्टेबल अजित पवार, वरिष्ठ लेखाकार महेश शिंदे, स्थानक प्रमुख तथा वाहतूक निरीक्षक शाहरुख खान, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, सहायक कार्यशाळा अधीक्षक शुभम ढाणे, वरिष्ठ लिपिक विकास कांबळे, रामकीसन माहोरे, यशवंत लोखंडे, जयवंत जाधव,चिंतामणी मेहेंदळे, वसंत भिलारे, लखन वायदंडे ,संतोष पवार ,विजयकुमार जमदाडे, राहुल खटावकर आदींची उपस्थिती होती.
आगार व्यवस्थापक कांबळे पुढे म्हणाले, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून वाहतुकीचे नियम न पाळता बेदरकारपणे वाहने चालवली जातात त्यामुळे अपघात होतात. वाहने चालवताना आपली सुरक्षितता बघतानाच रस्त्यावर चालणाऱ्या इतर वाहनांची देखील काळजी घेतल्यास अपघात होणार नाहीत. एसटी महामंडळ नेहमीच सुरक्षिततेला प्राधान्य देते त्यामुळे एसटी च्या चालकांनी सुरक्षित सेवा द्यावी. केवळ सुरक्षितता अभियानात वाहने सुरक्षित न चालवता वर्षभर वाहने सुरक्षित चालवली पाहिजेत .
सविता अवघडे म्हणाल्या, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघात होणार नाहीत. एसटी महामंडळ नेहमीच सुरक्षित सेवा देते त्यामुळे आजहि ग्रामीण भागात एसटी कडे दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून पहिले जाते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरक्षितता अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते. विकास कांबळे यांनी स्वागत केले.