२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याने देश हादरला होता या हल्ल्यात अनेक नागरिकांसह मुंबई पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. कामा हॉस्पिटल व सीएसटी रेल्वे स्थानकावर अंधाधुंद गोळीबार करून दोन अतिरेकी गिरगाव चौपाटीच्या दिशेने येत होते. यावेळी नाकाबंदी केली असता तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची कसलीही पर्वा न करता केवळ हातात लाठी असतानाही, क्षणार्धात अजमल कसाबवर झडप घालत त्याला जीवंत पकडले यावेळी कसाबने झाडलेल्या गोळ्यानी तुकाराम ओंबळे शहीद झाले. परंतु त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळेच पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला परंतु या घटनेला आज चौदा वर्ष झाली तरीही त्याच्या मूळ केडंबे (ता जावली ) या गावी भव्य स्मारक करण्याचे दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून हे स्मारक शासनाच्या लाल फितीत अडकल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली
तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे आणि अतुलनीय शौर्यामुळेच भारताला पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला . त्यांच्या या शौर्याला भारतासह अमेरिकेतील संसदेतही सन्मान करण्यात आला .स्मारकासाठी गावाची सार्वजनिक जागा दिली असून सदर जागा इनाम वर्ग होती त्याची व इतर खात्याच्या परवानगी घेऊन वाढीव निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे .या ठिकाणी खेळाचे साहित्य, क्रिडांगण, सुराज्ज वाचनालय तसेच युवा पिढीला मार्गदर्शक व प्रेरणा देणारे स्मारक लवकर उभे राहील . असे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गटाचे ) जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी सांगितले .
या स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तर मुंबई महानगरपालिकने गिरगांव चौपाटीवर त्यांचे स्मारक उभारले आहे. राजस्थानमधील एका तेलविहीरीलाही शहीद ओंबळे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. परंतु महाराष्ट्र शासनाने या स्मारकासाठी अद्याप कोणतीच ठोस पाऊले उचलली नाहीत, त्यांचे हे शौर्य युवा पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांचे हे कार्य तसेच आदर्शवत स्मारक त्यांच्या मूळ केडंबे गावी व्हावे अशी सर्वांची मागणी आहे .
सदर स्मारकासाठी अडीच एकर जागा शासनाकडे वर्ग केली आहे . मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मारकासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे . परंतु गेल्या चौदा वर्षापासून स्मारकासाठी रखडलेला निधी उपलब्ध करून २६ /११ या दिवशी स्मारकाचे भूमिपूजन न केल्यास दि . ३० नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसणार आहे .
- महादेव ओंबळे - उपसरपंच , ग्रामपंचायत केडंबे
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी ७१ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे पाठवला आहे . निधी उपलब्ध होताच स्मारकाच्या कामास सुरुवात केली जाईल .
- डि एच पवार - उपअभियंता - सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावली
विविध कार्यक्रमांचे आयोजन
हुतात्मा सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केडंबे ( ता . जावली ) येथे उद्या रविवारी दि.२६ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
अशी माहिती शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख (शिंदे गट) एकनाथ ओंबळे यांनी दिली. रविवारी सकाळी नऊ वाजता केडंबे येथे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे.यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ,जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोमवारी दि .२७ रोजी हुतात्मा ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनसेवा प्रतिष्ठान केडंबे यांच्यावतीने सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने संध्याकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्मृतिदिन कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा प्रतिष्ठान , केडंबे ग्रामस्थ यानी केलें आहे.