मेढा पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई


           मेढा पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

केळघर :- मेढा पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत दारूची चोरटी वाहतूकप्रकरणी व अवैध मटका जुगार चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
       याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की रिटकवली (ता. जावळी) येथे देशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मेढा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी एक पथक तयार करून छापा टाकला. या वेळी देशी विदेशी दारू व दारूची वाहतूक करणारी रिक्षा असा एकूण एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. दारू विक्रीच्या उद्देशाने दारू  वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, बाजीराव बळीराम बांदल व अवधूत किसन सावंत अशी त्यांची नावे आहेत.
        दरम्यान कुडाळ (ता. जावळी) येथे एका हॉस्पिटलच्या आडोशास एक जण मटका जुगार चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलिस दूरक्षेत्राचे पथक तयार करत त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एकाकडे जुगारासाठी आवश्यक साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सात हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सागर हणमंत जाधव (वय ३३, रा. उडतारे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post Next Post