मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरागें -पाटील यांना पाठींबा देण्यासाठी जावली तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मेढा येथे दुचाकी रॅली काढत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली .
केळघर : - जावली तालुका हा शूरांचा, वीरांचा , ऐतिहासिक तालुका असून येथील बहुतांश मराठा समाज हा कष्टकरी - शेतकरी आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे, राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे .
आज मेढा येथील भैरवनाथ मंदिर येथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली . कुंभारवाडा - वेण्णा विद्यामंदिर - वेण्णा चौक - आंबेडकर नगर चौक - एस टी डेपो - शिंदे कोयना हॉटेल मार्गे तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर रॅली चांदणी चौक - गणपती मंदिर - ग्रामीण रुणालय मार्गे मेढा पोलीस स्टेशनला निवेदन देवून रॅली छत्रपती शिवाजी महाराज बाजार चौक मेढा येथे आली .
यावेळी'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा', अशी जोरदार घोषणाबाजी या रॅलीमध्ये करण्यात आली. या रॅलीने संपूर्ण मेढा शहर भगवेमय झाले होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक , पदाधिकारी , नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जो पर्यत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही म्हणून शिवसैनिक सचिन जवळ ,सचिन करंजेकर,जितिन वेंदे, नामदेव चिकणे इतर पदाधिकाऱ्यानी आपले पदाचे राजीनामा दिले . तर तालुक्यातील केडंबे, गवडी , डांगरेघर , वागदरे , बामणोली, करंदी तर्फ कुडाळ आदि गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहेत .
यावेळी विलासबाबा जवळ यांनी आरक्षणाचे घोंगडे फार काळ भिजत ठेवू नका,आरक्षणाच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला . तर कुमारी अक्षदा तरडे (बामणोली ) हिने आपलं परखड मत व्यक्त केले .माजी नगराध्यक्ष पांडूरंग जवळ ,मंदाकिनी भिलारे,महेश पवार ,सुरेश पार्टे, सचिन करंजेकर ,शिवाजीराव देशमुख , शुभम तरडे, दादा करंदकर,मारुती चिकणे, बजरंग चौधरी ,चंद्रकांत धनावडे, आदिंनी आपल्या भाषणातून मराठा समाजाच्या व्यथा मांडत आरक्षण का गरजेचे आहे हे सांगितले . तर मनोज जरागें -पाटील यांच्या आमरण उपोषणाची तातडीने दखल घेत सरकारने आरक्षणाविषयी पाऊले उचलावीत यासाठी आम्ही साखळी उपोषणास सुरुवात करत आहोत असे सांगितले .दररोज एक गाव यापद्धतीने साखळी उपोषणास सुरुवात झाली असून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यानी संयोजकांशी संपर्क साधून आपापल्या गावांची नावनोदंणी करावी . असे आवाहन यावेळी करण्यात आले .
महाकाली ट्रव्हॅत्सच्यावतीने यावेळी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती .