केळघर : जावली तालुक्यात नुकत्याच सुरु
असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये २४ पैकी तब्बल १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करुन जावली तालुक्याने आदर्श निर्माण केला असला तरी उर्वरित आनेवाडीसह सहा गावांमध्ये निवडणुका प्रतिष्ठेच्या करण्यात आल्याने तिथे निवडणुकीचे धुमशान सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जावली तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असले तरी जावली तालुक्यातील जास्त प्रमाणात बिनविरोध निवडणूक झाली असून काही ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या पुढाऱ्यांनी मात्र निवडणुक लादल्याची चर्चा जनसामान्य मतदार करीत आहेत.
एकीकडे काही गावांमध्ये निवडणुकीचे धुमशान सुरु राहणार असले तरी जावली तालुक्यातील गाढवली पुनर्वसित भोगवली तर्फे मेढा, आसनी, ओखवडी, केळघर तर्फे सोळशी, तेटली, कोळघर, पानस, कावडी, एकीव, तळाशी, वाळंजवाडी, कुंभारगणी, आगलावेवाडी, गोंदेमाळ, गांजे, दुंद या १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून त्यांचे जावलीकरांकडून अभिनंदन होत आहे.तर नांदगणे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी केवळ एक अर्ज आला .
बिभवी, आनेवाडीसह सहा गावांमध्ये निवडणुकींचे धुमशान
जावली तालुक्याच्या सरहद्दीवरील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या आनेवाडी या राजकीयदृष्टया संवेदनशील गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लागलेली असून सरपंच व नऊ सदस्य रिंगणात आहेत. तर मेढा विभागातील बिभवी येथे भाऊबंदकीच्या लवाजम्यासह सरपंच व चार सदस्यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भामघर येथे सरपंच पदासाठी तर वाघदरे सरपंच व तीन वॉर्ड साठी निवडणूक होत आहे. कुरुळोशी सरपंच व तीन वॉर्डसाठी तर सांगवी तर्फे मेढा सरपंच बिनविरोध तर दोन सदस्य पदासाठी निवडणूक लागल्याची माहिती तहसीलदार कोळेकर यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत तहसीलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार सतीश मुनाळे. निवासी नायब तहसीलदार शोभा भालेकर व संजय बैलकर यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखेची पूर्ण तयारी झाली असून निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्या सर्व गावात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत झाले आहे.