मुख्यमंत्र्यांना केळघर ग्रामस्थांचे साकडे सातबारा कोरा करण्याची मागणी


मुख्यमंत्र्यांना केळघर ग्रामस्थांचे साकडे
सातबारा कोरा करण्याची मागणी; दरे येथे दिले निवेदन
केळघर - : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली तरी आम्ही पारतंत्र्यातील जीवन जगत असून, विविध शासकीय योजनांपासून वंचित आहोत. आमचा सातबारा कोरा करून मिळावा अथवा भूमिहीन म्हणून आमचे पुनर्वसन करावे, अशा आशयाचे लेखी निवेदन केळघर तर्फ मेढा येथील ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दरे येथे देण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी यावर योग्य तो पर्याय काढून आपल्याला न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
     मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या दरे या गावी आले असता केळघर तर्फ मेढा येथील ग्रामस्थांनी त्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या ताब्यात सातबारा उताऱ्यांवर असलेल्या कब्जेदार व भोगावटदार म्हणून आमची नावे होती; परंतु सन २००१ मध्ये राज्य शासनाकडून बेकायदेशीरपणे सदरी 'श्री भवानी देवी कब्जेदार देवस्थान किल्ले प्रतापगड, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (महाराज)' अशा पद्धतीने शिक्के मारण्यात आले आहेत. वास्तविक २००१ पूर्वी आमच्या सातबारा उताऱ्यांवर अशा कोणत्याही नोंदी नव्हत्या.
    या नोंदी बेकायदेशीरपणे घातल्याने आम्हाला पुढील अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचे शेती कर्ज मिळत नाही. कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक कर्ज मिळत नाही. शेतामध्ये विहीर खोदण्यास अगर नोंद करण्यास परवानगी मिळत नाही. शेतजमिनीची मोजणी करायची असल्यास मोजणी करून मिळत नाही.
          या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित खात्याला योग्य त्या सूचना करून अहवाल मागवला असून, ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
Previous Post Next Post